Sunday, February 1, 2009

आमची सेंट्रल-वारी..........

खालील घटना खरी असली तरी तिचा मृत किंवा गावाला गेलेल्या इतर अशा कोणत्याही घटनबाह्या व्यक्तींशी काही संबंध नाही, सर्व पात्रांच्या privacy ची काळजी घेऊन नावे वगळण्यात आली आहेत.


काल आमच्या नशिबात पुणे सेंट्रलला जाण्याचा योग आला. आता तुम्ही म्हणाल की आमच्या सारख्यांचे पुणे सेंट्रलला काय काम? तशी तर ती मोठी गोष्ट आहे, थांबा मग विस्ताराने सांगतो.....

दोन दिवसांपासून कुजबुज सुरू होती की पुणे सेंट्रल ला कशाचा तरी sale चालू आहे. रूम नं. D-303 मधील खाट क्र. ब वरील मित्राने कुठून खबर आणली होती की, पुणे सेंट्रल ला 50% पर्यंत discount चा आणि लीवाइस मधे पण तसाच काहीतरी sale चालू आहे. दोन तासांच्या गहन GD नंतर हे ठरवल्या गेले की आज आपण पुणे सेंट्रलला जाणार आहोत. त्या दोन तासाच्या GD मधे हे ठरवले गेले की, रूम नं D-303 खाट क्र. अ ला दोन जीन्स पॅंट्स घ्यायच्या आहेत, तर खाट क्र. ब ला शूज़ घ्यायचे आहेत, तर मला बॅडमिंटन रॅकेट घ्यायची आहे. (बॅडमिंटन हे सध्या आमच्या डोक्यात घुसलेल नवीन खूळ आहे, असे बरेच जणांचे मत आहे. त्यावर नंतर एखादा ब्लॉग लिहिनच, असो.) आणि रूम नं. D-306 मधील खाट क्र. ब ला फक्त पक्षी निरीक्षण (शुद्ध मराठीत bird watching) करायचे आहे, तर रूम नं. C-102 खाट क्र. क ला पण (बहुतेक) शूज़ घ्यायचे आहेत असे ठरले.....

आमच्या सारख्याना तर कारणच लागते अशा ठिकाणी जाण्याचे, (का? विचारू नका) म्हणून कधी नाही तो आम्ही चेहरा साबण लावून धुतला. मित्राकडून उधारीची fair and handsome घेऊन तोंडाला फासली. आठवडा पासून वापरलेले मोजे उलटे करून परत घातले आणि कधी नव्हे ते चांगले कपडे घालून सर्वांची स्वारी निघाली पुणे सेंट्रल च्या दर्शनाला. जाता जाता रस्त्यात ते sale वाले होर्डिंग दिसले. होर्डिंग पाहताच सर्वांचे चेहरे थोडेशे पडलेच, कारण त्यावर लिहिले होते की, upto 50% off, आणि आम्ही विचार केला होता की, flat 50% off. तरी पण त्यालाही न जुमानता आमची गाडी ATM कडे वळली. मंदि, महागाई, recession ह्या कशाचीही तमा न बाळगता आम्ही होते नव्हते ते सर्व पैसे ATM मधून काढले. आणि शेवटी आमचा मोर्चा निघाला पुणे सेंट्रल कडे.....

मॉल मधील AC चा सुगंध बाहेर मुख्य रस्त्यापर्यंत येत होता. आत मध्ये शिरण्या अगोदर सिक्युरीटी वाल्याने धातू-शोधक यंत्रा (ज्याला मराठीत metal-detector म्हणतात) खालून जाण्यास सांगीतले. पण आश्‍चर्य म्हणजे एका वृद्ध जोडप्याला त्याने काही न म्हणता जाऊ दिले, बहुतेक त्याला खात्री असेल की ही काय बॉम्ब वगैरे थोडीच आत घेऊन जाणार आहेत. आत मधे गेल्यावर कळले की मॉल म्हणजे नेमक काय असत. काय तो मॉल चा अवाढव्य परिसर, काय ती रोषणाई, सर्व काही निराळच. कधी नव्हे तो आमचा आणि escalator चा (यांत्रीक चढती-उतरती पायरीचा) सामना झाला. पहिल्यांदा तर चढताना पडता-पडता वाचलो, पण जसे काही आपण दररोज ह्या पायरीवारुन जातो असा चेहर्यावर भाव आणून वर चढलो.

सर्वात आधी मोर्चा शूज़ वाल्या section कडे वळला, आमच्यातले दोघे जन जीन्स पाहण्यासाठी गेले, आणि आम्ही तीघे जन शूज पाहण्यासाठी निघालो. सर्वात आधी आम्ही गेलो Reebok च्या दुकानात. हजार शूज़ पाहून एक पसंद पडला, आणि त्याची किंमत विचारली. समोरून उत्तर आले 4000 रुपये. किंमत ऐकताच पहिल्याचा चेहरा असा पडला की त्याला जसे काही आत्ताच कळले की त्याचा AppMech परत back राहिला आहे; दुसर्याने शूज़ जसे काही आईने शिव्या घातल्या की, "बंड्या, ठेव ती भरणी खाली नाही तर लाटण्याने मार खाशील", अशा आविर्भावत खाली ठेवली; लगेच माझ्या तोंडातून निघाले की, "Addidas चे शूज़ पण भारी दिसत आहेत, चला तिकडे पाहु". पूर्ण एक तासभर भटकत असताना आमची नजर "सुंदर" मुली शोधत होती, पण शेवटी कंटाळून एक निष्कर्ष काढला की, "चायनीज खाल्याने माणूस जाडा होतो", आणि आम्ही आमचे लक्ष बूटांकडे घातले. शेवटी मित्राला एक मनासारखे शूज़ मिळाले, आणि वरुन buy 1 get 1 free अशी ऑफर असल्यामुळे दोघा जणात compromise झाले. पण बहुतेक त्यांच्या नशिबात ते शूज़ नव्हतेच, कारण त्यांच्या साइज़ साठी ते शूज़ नव्हते. शेवटी महागाई ला कंटाळून मी दोघांना सोडून पळ काढला, आणि निघालो बॅडमिंटन रॅकेट शोधायला. तिथल्याच एका काउंटर वर विचारले तर त्याने सरळ टेनिस रॅकेट कडे बोट दाखवले. मी त्याला म्हटले की ती तर टेनिस ची रॅकेट आहे तर मला म्हणतो कसा की छोटी टेनिस ची रॅकेट वापर बॅडमिंटन साठी. मी कपाळाला हात लावला आणि त्याच्या knowledgeला शिव्या घालत चालता झालो.

तोपर्यंत जीन्स पॅंट्स वाले पण परत आले आणि आम्ही निघालो पुणे सेंट्रल भटकायला. पाचव्या मजाल्यापर्यंत गेलो पण काही कामाचे मिळाले नाही. चला परत म्हणून लिफ्ट मधे बसलो तर बिचारी लिफ्ट पण खाली यायचे नाव घेईना, कारण लिफ्ट मधे 10-12 जन चढली होती, लिफ्ट खाली जात नाही हे पाहून एकाने दरवाजा उधडून परत लावण्यासाठी बटन दाबले, आणि कशीबशी लिफ्ट सुरू झाली.

शेवटी खाली आल्यावर पहिली महत्वाची वस्तू मिळाली ती म्हणजे deodorant. आता तुम्ही म्हणाल ही वस्तू महत्वाची कशी काय? तर ते तुम्हाला नाही कळणार, कारण हॉस्टेल वर जेव्हा-जेव्हा झोपेतून उठण्या अगोदर heater/gizer बंद होते आणि गरम पाणी आंघोळीला नसते, तेव्हा-तेव्हा ही वस्तू कामाला येते. मग काय buy 1 get 1 free असल्यामुळे सर्वानी एक-एक बाटली उचलली. आणि शेवटी एकदाची आमची शॉपिंग संपुष्टात आली.

मॉल च्या बाहेर आल्या आल्या एक छोटेशे (पायरेटेड) पुस्तकांचे दुकान दिसले. आता आमचे पुस्तक प्रेम हे तर जगविख्यात आहे. म्हणून मग एक पुस्तक निवडले, सोबतच्या दोघा जणांनी पण एक-एक पुस्तक निवडले. आणि मग सुरू झाली किमती वरुन घासा-घासी. जसे काही microsoft ही yahoo ला विकत घ्यायला निघालीये अशा आविर्भावात. शेवटी 10-20 रुपयांवरून बोलणी फिसकाटणार एवढ्यात त्या दुकानदाराने माघार घेतली. आणि पुस्तके घेऊन आम्ही हॉस्टेल कडे रवाना झालो.....

सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे, आम्ही घ्यायला गेलो एक आणि घेऊन आलो एक. हॉस्टेल ला आल्यावर तसे ठरले होते की जेवून लिवाइसला जायचे, पण मी काढता पाय घेतला. आफ्टर ऑल माझी बॅडमिंटन रॅकेट तीथे थोडीच मिळणार होती. असो, तर अशी झाली आमच्या जीवनातली पहिली सेंट्रल-वारी..... कधीही न विसरणारी.....


Sunday, January 4, 2009

ते सोनेरी दिवस...............


दुपारची वेळ........... रविवार असल्यामुळे उशिराचेच जेवण. सुटी लागल्याने सर्वजण घरी गेले होते. त्यामुळे क्रिकेट खेळने पण बंद होते. नविन movie पण नव्हती. म्हणुन PC वर जुने youtube चे डाउनलोड केलेले विडियो पाहात बसलो होतो. त्यात एक जुने "शक्तिमान" चे विडियो सॉंग सापडले, आणि अचानक लाईट गेली. आता काय करणार म्हणुन विंग मधे खुर्ची टाकुन i-pod वर गाने ऐकत बसलो. गाने ऐकत असलो तरी डोक्यात ते शक्तिमान चे गानेच घुमत होते. जुने दिवस आठवत होते की कसे आम्ही शनिवारी दुपारी शाळा बुडवून घरी पळायचो. त्याकाळी बरोबर शनिवारी सकाळी ११:३० वाजता आणि परत तोच एपिसोड मंगळवारी रात्री १०:३० वाजता दूरदर्शन वर यायचा. आणि त्यादराम्यान जर लाईट गेली तर असे वाटायचे की जगात लाईट जाने ह्याशिवाय दुसरी कोणती वाईट गोष्ट असूच शकत नाही. आणि हळूहळू लहानपणीचे दिवस आठवू लागले.
त्याकाळी दूरदर्शनवर जे काही पण कार्यक्रम दाखवले जायचे ते पाहावे लागत, कारण आजच्या सारखे सतराशे साठ चैनल्स नव्हते. चित्रहार, चंद्रकांता, रामायण, महाभारत हीच काय ती सर्वात भारीची सिरिअल्स होती, आणि तीपण जाहिरातींशिवाय.
लहानपणी शाळेला सुट्टी म्हंटल की, वेगळीच मजा असायची. सकाळी उशिरापर्यंत झोपून रहायचे, मस्त पैकी जेवणावर ताव मारायचा आणि दिवसभर खेळायचे. रविवारी मात्र माहौल थोडा वेगला असायचा. सकाळी आई काहीतरी नविन पदार्थ बनवायची. संध्याकाळी ४ वाजता दूरदर्शन वर मराठी चित्रपट यायचा, त्यातल्या-त्यात लक्ष्या आणि अशोक सराफ ह्या जोडीचा चित्रपट असेल तर मग तर धमाल. कितींदा आलेला असेल तरी परत पहाण्यात वेगळीच मजा येत असे.
उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जायचे म्हंटले तर मग काय..... मामाचे गाव म्हणजे एक छोटेसे खेडेच. म्हशींवर बसून अख्खे वावर फिरायचो. ते दिवस मी आजपण विसरु शकत नाही. न पिकलेल्या आंब्याची, दगड मारून तोडलेल्या चिंचांची चव आजपण जीभेवर तरळते. मला आज पण आठवते की त्याकाळी सकाळी उठल्यावर आम्ही कोळश्याने दात घासायाचो, कारण त्याकाळी आजच्या सारखी महागडी टूथपेस्ट नव्हती.
चंपक आणि चंदामामा ही तर सर्वात favourite पुस्तके. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला बाबांच्या मागे लागुन त्याना ती पुस्तके आणन्यासाठी भाग पाडले जायचे. बय्राचादा पहिल्या २-३ दिवसांमाधेच त्यांचा फडशा पाडला जाई.
प्रत्येकाच्या आयुष्यातला हा काळ, त्यांच्यासाठी special असतो. व्यक्तीपरत्वे अशा आठवणी बदलत असतात. दिवाळीचे फटाके, आईच्या हाताच्या चकल्या, रिकाम्या वेळेतले चोर-पोलिस, तेव्हांचे सुपरहिरो (सुपरमैन, ही-मैन, etc.), कॉमिक्स व गोट्या, २ रुपयाच्या १० गोळ्या, पहिल्या पावसाताल्या चिखलात ख़राब केलेले कपडे (आणि नंतर आईचा खालेला मार), गणिताच्या सरांची छड़ी, writing pad आणि कागदांच्या बोळ्याचे बैडमिंटन, पत्त्यांचे बंगले, वहीच्या मागच्या भागात शिकवत असलेल्या शिक्षकांचे कार्टून्स, नविन कुत्र्याचे पिल्लू, वेड्यासारखे फूलपाखारामागे धावने, मित्राकडे असलेले खेळणे मलापण हवे म्हणुन रडणे, सुटीत चेंज म्हणुन कुठे जायचे ह्यासाठी बहिणी समवेत रात्रभर केलेले GD, ह्या सर्व गोष्टी आठवल्या की चेहरयावर वेगळच हसू येते. कारण तेंव्हा न भूतकाळाची चिंता होती न भविष्यकाळाची. मनात एक निरागसतेचा भाव होता. आता मात्र राहून राहून असे वाटते की ती निरागसता, ते भोळेपण जगण्याच्या स्पर्धेत हरवत चालले आहे. पण मनाला मात्र ते दिवस आठवले की ते एकच सवाल विचारते, "ते सोनेरी दिवस" परत येतील का?

Wednesday, December 31, 2008

सुरुवात.....

सर्वात आधी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. २००९ हे वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख-सम्रद्धि, आनंद, आणि यशाची बरसात करो..............

नवे वर्ष , नवी आस
नवे छंद , नवा ध्यास

नवे वर्ष , नवी आशा
नवे पर्व , नवी दिशा

नवे वर्ष , नवा नाद
नवी रूची , नवा स्वाद

नवे वर्ष , नवा बोध
नवा वेध , नवा शोध

नवे वर्ष , नवे गीत
नवे मित , नवे हित

नवे वर्ष , नवी चाल
नवा ताल , नवा काल......


हां, तर माझे नाव अभिषेक झांबरे. मी शासकीय अभियान्त्रिकी महाविद्यालयात (commonly known as COEP i.e. College Of Engineering, Pune) मधे संगणक अभियान्त्रिकीला (again Computer Engineering) आहे.


खुप दिवसांपासून ब्लॉग सुरु करण्याचा विचार करत होतो, शेवटी नविन वर्षाच्या सुरुवातीला ब्लॉग सुरु करण्याचा निर्णय घेतला (आणि त्यातल्या त्यात मराठीमधे).

मला क्रिकेट आणि बैडमिन्टन फार आवडते, आणि निवांत वेळेत मी चित्रपट पाहतो आणि गाणे एकतो. मला वाचण्याची पण आवड आहे (पण सकाळचे वर्त्तामनापत्र आणि अभ्यासाची पुस्तके ह्या शिवाय काही वाचायला मिळतच नाही).

तर मग पहिल्या पोस्ट पुरते एवढे पुरेसे आहे. आता काय भेटतच राहू. टाटा बाय-बाय.........